सातारला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर

प्रकाशन दिनांक : 30/05/2018

पालकमंत्र्यांनी सातारकरांना दिलेला शब्द खरा केला

मुख्यमंत्र्यांची आश्वासन पूर्ती ; पालकमंत्र्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
सातारा, दि.29 : सातारा येथील मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 100 खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मालकीची सातारा येथील कृष्णा प्रकल्पांतर्गतची 25 एकर जमिनी देण्याचा आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे सातारकरांना एक वैद्यकीय महाविद्यालय त्याबरोबर दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सातारकरांना दिलेला शब्द खरा केला. साताऱ्यात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. या मंत्रीमंडळ बैठकीत याला मंजूरी देवून आश्वासनाची पूर्ती केली. त्याबद्दल पालकमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
नियामक मंडळाच्या 31 जुलै 2013 रोजी झालेल्या 77 व्या बैठकीत ठराव क्र. 77/8 नुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी व 100 रुग्ण खाटांचे संलग्नीत रुग्णालयासाठी तसेच 100 खाटांचे महिला रुग्णालयासाठी काही अटी व शर्तीच्या अधीन राहून 50 एकर जागा देण्यास नियामक मंडळाची मान्यता देण्यात आली आहे.
या मागणीबाबत पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे दि. 10 फेब्रुवारी 2015 रोजी मुंबईत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी 25 एकर जागा पुरेशी असून ती सातारा-पंढरपूर रस्त्यालगत कण्हेर उजव्या कालव्याच्या पूर्वेस व पश्चिमेस 25 एकर जागा निश्चित करण्यात आली.
सातारा वैद्यकीय महाविद्यालयास हस्तांतरीत करावयाच्या 25 एकर जागेपैकी 5 एकर जागेमध्ये कार्यालय, कर्मचारी निवासस्थाने, शाळा, व्यावसायिक गाळे इ. बांधकामे आहेत. 25 एकर जागेची चालू मुल्यांकनानुसार 33.08 कोटी बाजारमुल्य आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 24 मे 2015 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीमध्ये विविध विकासकामांचा आढावा घेताना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मालकीचे कृष्णानगर वसाहत सातारा येथील जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास जिल्हाधिकारी, सातारा यांच्यामार्फत हस्तांतरीत करण्याबाबत आदेश दिलेले होते.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसादिनी मेडिकल कॉलेजला जागा देण्याबाबत घोषणा केली होती.
सातारा येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालय सुरु झाल्याने सातारा शहर तसेच जिल्ह्यातील गरजू रुग्णांना विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प पूर्णत: शासनाचा असून नियोजित वैद्यकीय महाविद्यालयामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध होणार असल्याचेही पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.